◆ श्रीमंतांना जाळ्यात अडकविणारा युवक आरोपी यवतमाळ पोलीसांचे जाळयात
● मूकनायक : चांदू मोरे
यवतमाळ :- सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलेच्या नावाने दिल्ली येथील एका नामांकित डॉक्टरसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून मौल्यवान दागिन्यांसह तब्बल २ कोटी रुपये लाटल्याची धक्कादायक घटना पुढे आली असून, या प्रकरणी यवतमाळ शहरातील अरुणोदय सोसायटीतील २१ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक कोटी ७२ लाख रुपयांसह दागिने जप्त करण्यात आले आहेत.
यवतमाळ येथील एका तरुणीने दिल्लीमधील नामांकित डॉक्टरला दोन कोटी रुपयाला फसविल्याची तक्रार यवतमाळ पोलिसांकडे प्राप्त झाली होती. पोलिसांनी अवघ्या २४ तासात या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. विशेष म्हणजे, सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणारी ही स्त्री नव्हे तर पुरुषच असल्याचे उघड झाले आहे.
दिल्ली येथील या डॉक्टरशी महिला असल्याचे भासवून सदर तरुणाने मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. जवळीकता निर्माण झाल्यानंतर या तरुणाने डॉक्टरकडे मोबाईल, अंगठीसह दागिन्यांची मागणी केली. डॉक्टरांनीही या वस्तू भेट म्हणून दिल्यानंतर या तरुणाने बहिणीचे अपहरण झाल्याचा बनाव केला. बहिणीला सोडविण्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांना सांगितले.
डाॅक्टर दिल्ली येथून यवतमाळ येथे आले. येथील एका हॉटेलच्या बाहेर समर नामक व्यक्तीस त्यांनी रक्कम सोपविली. त्यानंतर डॉक्टर दिल्लीला परतल्यानंतर पुन्हा ४ लाखांची रक्कम बँकेच्या अकाऊंटवर मागविली. ही रक्कम मिळताच बँक अकाऊंट अचानक बंद झाले. डॉक्टरांना फसल्याचा संशय आल्याने त्यांनी थेट यवतमाळ पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून तक्रार दिली.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले असता, डॉक्टरांची फसवणूक करणारी महिला नव्हे तर पुरुष असल्याचे पुढे आले. त्यानंतर पोलीस पथकाने अरुणोदय सोसायटीतील एका घरी किरायाने राहणाऱ्या इसमावर धाड टाकली असता संदेश अनिल मानकर यानेच महिला असल्याचे भासवून डॉक्टरला फसविल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मानकर याच्या घरातून १ कोटी ७२ लाख ६ हजार १९८ रुपयांसह ४ लाखांचे सोन्याचे दागिने तसेच विविध कंपन्यांचे मोबाईल असा एकूण १ कोटी ७८ लाख सहा हजार १९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.