धनंजय मुंडे यांची फसवणूक, बार्टीचा निधीचा वापर कशासाठी
सांगली दि. २५: भीमा कोरेगाव अतिक्रमण व जागे संदर्भात वाद कोर्टात सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्व परवानगी शिवाय तिथे कोणताही कार्यक्रम राबवला जाऊ शकत नाही, हे माहीत असून देखील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी १०० कोटी विकासाच्या थुलथापा मारत तमाम आंबेडकरी जनतेची फसवणूक केली आहे. मागील वर्षी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भीमा कोरेगाव विजयस्तंभ विकासाबाबत लागेल तेवढा निधी देऊ असे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले, एक रुपयाचा निधी देखील आजतागायत मिळाला नाही.
सदर ०१ जानेवारी २०२२ रोजीच्या भीमा कोरेगाव कार्यक्रमाचा आराखडा, नियोजन जबाबदारी डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र अर्थात बार्टी कडे सोपविण्यात आली आहे मुळातच दोन वर्षानंतर बार्टीला केवळ ९० कोटी देण्यात आले, मागील दोन वर्षापासून पीएचडी, एमफिल फेलोशिप थकीत आहे, स्वाधार, परदेशी शिष्यवृत्ती मिळाले नाही, सोबत इतर ५९ कल्याणकारी योजना निधी अभावी बंद पडत आहेत. अशी विदारक परिस्थिति असताना बार्टीकडे सदर ०१ जानेवारी भीमा कोरेगाव कार्यक्रमाचा खर्चाची जबाबदारी का देण्यात आली ? या करिता सांस्कृतिक विभागाचा पैसा का वापरला जात नाही याचे उत्तर धनंजय मुंडे यांनी द्यावे. आधीच निधीची कमतरता त्यात मुंडे यांचा गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, याचा जाहीर निषेध रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे प्रमुख अमोल वेटम यांनी केला.