भारतातील धर्मनिरपेक्षतेचा अर्थ म्हणजे राष्ट्रासाठी सर्व धर्म समान आहेत. १९७६ सालच्या ४२ व्या घटना दुरुस्तीच्या कायद्यानुसार भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. कायदा आणि सुव्यवस्थाद्वारे देशांमध्ये धार्मिक विविधता आणि धार्मिक सहिष्णुता ह्या दोन्ही गोष्टी जपल्या जातात; भारताच्या संविधानाने धर्म स्वातंत्र्याचा हक्क हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित केला आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतामधील ७९.८% लोक हिंदू धर्मीय आहेत; त्याखालोखाल मुसलमान १४.२%, ख्रिश्चन २.३%, शीख १.९%, बौद्ध ०.७% व जैन ०.४% आहेत. या व्यतिरिक्त झोराष्ट्रीयन व यहूदी व इतर धर्म व प्रथांचे पालन करणाऱ्या नागरीकांचे प्रमाण ०.६% आहे.याचाच अर्थ असा की भारतात मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, बौद्ध, पारशी आणि जैन हे अल्पसंख्याक आहेत.हया सर्व अल्पसंख्याकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जाणीव व्हावी म्हणून दरवर्षी १८ डिसेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो.त्यानिमित्याने या लेखात आपण अल्पसंख्याकांचे हक्क व त्यांना भारतीय घटनेत काय काय हक्क दिलेले आहेत हे बघणार आहोत.तसेच अल्पसंख्यांक आयोग त्यांच्यासाठी कुठली कामे करतात ते माहित करून घेणार आहोत.
संयुक्त राष्ट्र संघटनेने १८ डिसेंबर १९९२ रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्वीकृत करुन प्रस्तुत केला. त्यामुळे दरवर्षी १८ डिसेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. अल्पसंख्यांकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जाणीव करुन देणे हा त्यामागील उद्देश आहे.
भारताच्या गृह मंत्रालयाच्या १२ जानेवारी १९७८ च्या ठरावानुसार अल्पसंख्याक आयोगाची स्थापना करण्यात आली होती, ज्यामध्ये विशेषत: असे नमूद करण्यात आले होते की संविधान आणि कायद्यामध्ये संरक्षण प्रदान केलेले असूनही, अल्पसंख्याकांना असमानता आणि भेदभाव जाणवतो. धर्मनिरपेक्ष परंपरा टिकवून ठेवण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्यासाठी भारत सरकार अल्पसंख्याकांसाठी सुरक्षा उपाय आणि वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या प्रशासकीय योजनांवर विशेष भर देते , त्यांच्यासाठी राज्यघटना, प्रभावी संस्थेची व्यवस्था करणे. केंद्रीय आणि राज्य विधानमंडळांमध्ये लागू केलेल्या धोरणांच्या सुरक्षा उपायांची प्रभावी अंमलबजावणी करणे हा त्यामागील उद्देश आहे.
राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे पहिले अध्यक्ष न्यायमूर्ती मोहम्मद सरदार अली खान (१९९३-१९९६) होते.सध्या सरदार इकबाल सिंह लालपुरा राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आहेत.
अल्पसंख्यांक आयोगाची कामे :
१. केंद्र आणि राज्यांच्या म्हणजेच अल्पसंख्याकांच्या प्रगती आणि विकासाचे मूल्यमापन करणे.
२. संविधानात नमूद केल्यानुसार अल्पसंख्याकांच्या संरक्षणाशी संबंधित कामाचे पर्यवेक्षण करणे आणि संसद आणि राज्य विधानमंडळे/परिषदांनी लागू केलेले कायदे.
३. अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारांकडून संरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिफारसी करणे.
४. अल्पसंख्याकांच्या हक्कांपासून वंचित राहणे आणि त्यांच्या संरक्षणाशी संबंधित विशेष तक्रारींची तपासणी करणे आणि अशा बाबी संबंधित अधिकाऱ्यांकडे मांडणे.
५. अल्पसंख्याकांविरुद्ध कोणत्याही प्रकारच्या भेदभावामुळे उद्भवणाऱ्या समस्यांच्या कारणांचा अभ्यास करणे आणि त्या सोडवण्यासाठी उपायांची शिफारस करणे.
६. अल्पसंख्याकांच्या सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक विकासाशी संबंधित विषयांचा अभ्यास, संशोधन आणि विश्लेषण करण्याची व्यवस्था करणे.
७. अल्पसंख्यांकांशी संबंधित कोणतीही योग्य पावले केंद्र सरकार किंवा राज्य सरकारांनी उचलली पाहिजेत असे सुचवणे.
८. अल्पसंख्यांकांशी संबंधित कोणत्याही विषयावर, विशेषत: त्यांना येणाऱ्या अडचणी आणि केंद्र सरकारला नियतकालिक किंवा विशेष अहवाल तयार करणे.
९. केंद्र सरकारसमोर ठेवल्या जाणाऱ्या इतर कोणत्याही विषयावरील अहवाल तयार करणे.
अल्पसंख्यांक कोणाला म्हणायचे:
१. धार्मिक अल्पसंख्यांक – राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग अधिनियम १९९२ मधील कलम २(क) नुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेले तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने राज्य अल्पसंख्याक आयोग अधिनियम २००४ मधील कलम २ (ड) नुसार खालील सहा समुदाय अल्पसंख्याक लोकसमूह घोषित केले आहेत. ते ६ समुदाय म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, बौद्ध, पारशी आणि जैन हे होते. २७ जानेवारी २०१४ रोजी, केंद्र सरकारने राष्ट्रीय अल्पसंख्याक कायदा, १९९२ च्या कलम 2 (क) च्या अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून जैन समाजाला अल्पसंख्याक समुदाय म्हणून अधिसूचित केले.
२. भाषिक अल्पसंख्याक – भारतातील राज्यामध्ये राज्यभाषेव्यतिरिक्त इतर भाषा मातृभाषा असलेल्या लोकसमूहाला भाषिक अल्पसंख्याक म्हणून गणण्यात येते. त्यामुळे भाषिक अल्पसंख्याक समुदाय प्रत्येक राज्यात भिन्न असेल. महाराष्ट्रामध्ये मराठी व्यतिरिक्त अन्य भाषा मातृभाषा असणाऱ्या लोकसमूहाला भाषिक अल्पसंख्यांक गणण्यात येते.
अल्पसंख्यांक समाजाचे हक्क : अल्पसंख्यांकांचे महत्व लक्षात घेऊन भारतीय राज्यघटनेत मुलभूत हक्कामध्ये त्यांचा समावेश केलेला आहे .
कलम २७ – एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता कर देण्याबाबत स्वातंत्र्य : एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता कर देण्याची सक्ती कोणत्याही व्यक्तीवर करता येणार नाही. या कलमांचा विचार केल्यास धार्मिक समुदायांना धार्मिक व्यवस्थापन करण्याचा अधिकार आहे. मात्र, अशा संस्था त्या त्या धर्मातील व्यक्तीवर कोणतीही सक्ती करू शकत नाहीत. व्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाचा महत्त्वाचा गाभा आहे. याचे स्मरण सर्वांनी बाळगले पाहिजे.
कलम २८ – विवक्षित शैक्षणिक संस्थात धार्मिक अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य : असे स्पष्टपणे सांगितले आहे की, राज्याच्या निधीतून चालवल्या जाणाऱया कोणत्याही शिक्षण संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. अशा संस्थेशी संलग्न असणाऱया जागेत धार्मिक उपासना चालवली जात असेल, तर त्या व्यक्तीच्या इच्छेनुसार किंवा व्यक्ती अज्ञान असल्यास पालकांच्या सहमतीशिवाय सहभाग घेतला जाऊ नये.
कलम २९ – अल्पसंख्यांक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण : आपली स्वतःची भाषा, लिपी किंवा संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे. तसेच शासकीय अनुदान असणाऱया संस्थेत कोणत्याही नागरिकास त्यांच्या धर्म, वंश, जात, भाषा यापैकी कोणत्याही कारणांवरून प्रवेश नाकारता येणार नाही.
कलम ३० – शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्यांक वर्गाचा हक्क : धर्म आणि भाषा या निकषानुसार अल्पसंख्यांक वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा अधिकार आहे. अशा संस्थांना आर्थिक साहाय्य करताना सरकारला भेदभाव करता येत नाही.
कलम ३५० क – प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिकण्याच्या सोयी : हया कलमानुसार अल्पसंख्याक नागरिकांच्या मुलांना प्राथमिक स्तरावर त्यांच्या मातृभाषेत शिक्षण मिळण्याचा हक्क आहे. राज्यांनी आपल्या राज्यात अशा शिक्षण संस्था स्थापन कराव्यात, अशी संविधानाने अपेक्षा केली आहे.
— इंजी .प्रणय सोहमप्रभा ,नागपूर