एन. डी. गेले. महाराष्ट्राच्या लढाऊ परंपरेतील शेवटचा मालुसरा धारातीर्थी पडला. गणपतराव देशमुख यांच्या पाठोपाठ एन. डी. यांनी जाणे म्हणजे अन्याय-अत्याचाराविरोधातील रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या सेनापतीनेच जाणे आहे. एन. डी. यांच्या निधनानंतर सामान्य माणसांचा आवाज बुलंद करून रस्त्यावर उतरण्याची हिंमत दाखवणारा आता कोणीही राहीला नाही. तिकडे विदर्भातील जाबुवंतराव असेच अचानक गेले, मृणालताईही अचानक गेली. एन. डी. जाता जाताही यमराजाशी आपला लढा झुंजत राहीले होते. एन. डी. गेल्याची बातमी कानावर आपटली आणि क्वारंटाईनची बंधणे तोडून एन. डी. यांच्या पार्थिवाच्या पायाला हात लावण्याची तीव्र इच्छा मनात होती. एन. डी. हे असे योद्धे होते की, जो रस्त्यावरची सामान्य माणसाची लढाई लढतच राहिला. पण त्याचवेळी वैचारिक आघाडीवर भल्या-भल्या बुद्धीवंतांची किंवा विधानसभेतील वैधानिक आघाडीवर भल्या-भल्या मंत्र्यांची फटफजीती करण्याची वैचारिक ताकद एन. डी. यांच्या विचारांत होती. अभ्यासात, वागण्यात आणि चारित्र्यातही होती. त्यामुळेच शरद पवार यांचे सख्खे मेहुणे असतानाही वैचारिक भूमिकेशी एन. डी. यांनी आयुष्यभर कधीच तडजोड केली नाही. जिथे लढा आहे तिथे एन. डी. आहेत. मग तो बेळगाव -कारवारचा सीमा लढा असो, महागाईविरोधातील लढा असो, संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो, सेझ विरोधातील रायगडच्या शेतकऱ्याचा लढा असो नाहीतर कोल्हापूरच्या टोलनाक्याचा लढा असो.. लढा कोणताही असो आणि समोर कोणीही नेता असो त्या नेत्याची, जाती-पातीची नात्यागोत्याची किंवा सत्तेची पर्वा एन. डी. यांनी कधीच केली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात येसाजी कंक, तानाजी मालुसरे, बाजी प्रभू, हंबीरराव मोहिती किंवा अलोजीबाबा कसे भरधार छातीचे होते.. आणि वैचारिकदृष्ट्या एका विचारावर ठाम होते. धन्याशी इमान राखणारे होते. एन. डी. यांच्याकडे पाहिल्यानंतर दोन हातात दोन दानपट्टे घेवून लढणारे ते नरवीर कसे असतील, याचा अंदाज बांधता येउ शकतो. भक्कम वैचारिक भूमिकेचा, भरदार-पीळदार शरीरयष्टीचा,… माईक असो किंवा नसो.. हजार- पाच हजार लोकांपर्यंत माईकशिवाय खणखणीतपणे आपला शब्दन् शब्द काळजाच्या ठाक्यापर्यंत ज्या नेत्याचा पोहोचू शकत होतो त्याचे नाव एन. डी. पाटील होते.
६० वर्षांच्या पत्रकारितेतील दोन हातात दोन दानपट्टे घेवून लढणारी एन. डी. यांची अनेक रूपे आज डोळ्यांसमोरून तरळत आहेत. तो इस्लामपूरचा गोळीबार. ओडीसाच्या गोळीबारात चार तरुण मृत्युमुखी पडलेले. त्यामध्ये एन. डी. यांचा सख्खा पुतण्या.. गणपतराव सांगत होते.. ‘मोर्चा थांबवूया’. एन. डी. सांगत होते.. ‘ नाही. बिलकूल नाही. मोर्चा थांबणार नाही..’ आणि हजाराेंचा मोर्चा पुतण्याच्या प्रेताला आडवे जावून कचेरीवर धडकतो.
वैरागचा मोर्चा. त्या मोर्चावरही गोळीबार झाला. एन. डी. ताठ मानेने तासभर बोलत उभे राहीले. रायगडच्या सेझच्या शेतकऱ्यांचा लढा मुकेश अंबानी यांनी सगळी ताकद पणाला लावून लढा चिरडून काढण्याकरिता सगळे उपाय वापरले.. शांततामय मार्गाने हजारो शेतकऱ्यांना नागोठणे-वडखळ रस्त्यावर उतरवून एन. डी. यांनी ‘सेझ’ चा लढा कसा लढवला आणि अंबानी यांनी पळता भुई थोडी केली. काय होता सेझ चा लढा? ‘अ’ शेतकऱ्याने दोन एकर जमीन सेझसाठी विकली तर त्याच्या राहीलेल्या दहा एकर जमिनीला काटेरी कुंपन ठोकून सगळे शेत हडपण्याचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील एन. डी. पाटील रायगडच्या रस्त्यावर उतरले. एन. डी. यांनी प्राणपणाने जे जे लढे लढवले आहेत ते ते लढे त्यांनी जिंकलेले आहेत एवढेच नव्हे तर सेझ च्या लढ्यात रायगडमधील शेतकऱ्याला एन. डी. यांनी सन्मानाने उभे केले.
एन. डी. विधानसभेत लढले. रस्त्यावर लढले. एकदा त्यावेळचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण त्यांना म्हणाले होते की, ‘ तुम्ही कितीही जोरात बोललात तरी बहुमत आमच्या मागे आहे.’ एन. डी. ताडकन् म्हणाले. ‘ होय.. मुख्यमंत्रीसाहेब, बहुमत तुमच्यामागे आहे हे मला मान्य आहे म्हणून तर तुम्ही सत्तेवर आहात. लोकशाहीचा खेळ एकावन्न विरुद्ध एकोणपन्नास असाच असतो. त्या खेळात तुमच्यासोबत एकावन्न आहेत. पण आम्ही रस्त्यावर जेव्हा लढाई लढायला उतरतो तेव्हा आमच्यासोबत एकावन्न असतात, हे लक्षात ठेवा. डोकी मोजून सत्ता मिळत असली तरी रस्त्यावरच्या लढाईत आमचेच बहुमत आहे. आम्हाला सत्तेची पर्वा नाही.’ आणि एन. डी. यांना सत्तेची पर्वा कधीच नव्हती. १९७८ साली पुलोद च्या सरकारात शरद पवार यांच्या मंत्रीमंडळात ते सहकार मंत्री होते. फेब्रुवारी १९७९ मध्ये राष्ट्रपती राजवट लावून इंदिरा गांधी यांनी शरद पवार यांचे सरकार बरखास्त केले. सरकार बरखास्त झाल्याची बातमी आल्याबरोबर शरद पवार ॉस्ट्रेलियाविरोधातील सामना बघायला वानखेडे स्डेडीअमवर गेले. आणि एन. डी. पाटील मुंबई-कोल्हापूर लाल डब्याच्या एस. टी. ने रात्रभर प्रवास करून कोल्हापूरला गेले. रयत शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षपदाचा काळ सोडला तर एन. डी. यांनी सगळा महाराष्ट्र एस. टी. मध्ये बसूनच पिंजून काढला आहे. संपूर्ण महाराष्ट्र पायाखाली घातलेला एन.डी. यांच्यासारखा नेता दुसरा कोणी नाही.. सामान्य माणसांच्या बांधिलकीचे राजकारण आता कायमचे संपले. गणपतराव देशमुखा आणि एन. डी. यांच्यासोबतच ते निघून गेले. संप तोडून काढणारे आता सत्तेवर बसले आणि एस. टी. ने फिरणारे एन. डी. आता राहीले नाहीत. तो लढावू महाराष्ट्र आता संपलेला आहे. शेवटचा लढवय्या म्हणून एन. डी. यांचेच नाव घ्यावे लागेल. गरीब माणसांच्या प्रश्नांशी महाराष्ट्रात आता कोणालाही काही पडलेले नाही. मुंबईचा गिरणी कामगार प्रचंड उभ्या असलेल्या मॅालच्या इमारतींखाली चिरडला गेला. शेतकऱ्यांचा वाली असलेला शेवटचा मालुसरा एन. डी. यांच्या रूपाने आता अस्थंगत पावला आहे.
एन. डी. यांच्या प्रमाणेच आयुष्यभर त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी माई ही तेवढीच सुंदर स्त्री आहे. एन. डी. यांना शेवटपर्यंत त्यांनी साथ दिली. माहेरची ओढ त्यांना कधी वाटली नाही. पेटलेला पदर आणि न विझलेला निखारा घेवून माई आयुष्यभर एन. डी. यांच्या पाठिमागे चालत राहीली. माई तू धन्य आहेस. एन. डी. यांची पत्नी होणे सोपे नव्हते. एन. डी. होणे सोपे असेल. पण एन. डी. यांच्या पत्नी होणे अवघड होते. ते तुम्ही करून दाखवलेत. एन. डी. नाहीत. त्यांच्या पायावर नमन.. तुम्ही आहात तुमच्याही पायावर नमन. महाराष्ट्राने शेवटचा योद्धा गमावला आहे..
– मधुकर भावे