कराड 🙁 विकास मस्के)
09 ऑगस्ट क्रांती दिन म्हणून संपूर्ण देशभरात साजरा होत असताना कराड येथे बस स्थानक परिसरात शहरातील विविध सामाजिक संस्था संघटना यांनी एकत्र येऊन क्रांती दिनाचे आणि स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करून साजरा करण्यात आला
सातारा जिल्ह्यातील कराड परिसरात क्रांतिकारकांचा मोठा वारसा असून जिल्ह्यातील पत्रीसरकारचे अनेक क्रांतिकारक या परिसरातून आल्याची भावना जनमानसातून व्यक्त करण्यात आल्या. क्रांतिकारकांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी बोधी फाउंडेशनचे अध्यक्ष विकास मस्के यांच्या नेतृत्वाने आणि कराड न्यायालयातील ॲट्रॉसिटी विशेष सरकारी वकील ॲड. श्री. प्रवीण पाटील यांचे अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षीय भाषणात अँड. प्रवीण पाटील यांनी समाजातील तरुणांनी आपल्या देशाप्रती सजग असणे विशद करताना तरुणांना ही कायदा न्यायपालिका याबाबत जागरूक असणे अत्यंत आवश्यक असून कायदा हा सर्वांशी निगडित असणारा घटक असल्याचे नमूद केले.
कराड तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक ‘आपले शेतकरी मंच’ चे अध्यक्ष श्री. आनंदराव सदाशिव थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी स्वातंत्र्य वेळी असणारी परिस्थिती विशद करून क्रांतिकारक आपल्या देशाप्रती व्यवस्थेप्रति किती सजग होते हे विशद करून भावनिक स्मरण केले; तसेच शासनाची धोरणे शेतकऱ्यांच्या हिताची असावीत व ती समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठीची व्यवस्था होणे गरजेचे असल्याचे नमूद केले.
कराड एसटी डेपोच्या सहकार्याने झालेल्या कार्यक्रमात डेपोचे प्रमुख अधिकारी ,ओबीसी संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संविधान प्रस्ताविकेचे वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच ज्येष्ठ विचारवंत दिवंगत डॉ. हरी नरके यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाचे जिल्हा समन्वयक किशोर जाधव यांनी नागरिक शास्त्र विषय मुलांचे शिक्षणात प्रमुख विषय म्हणून समाविष्ट करण्याचा ठराव मांडला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानदीप सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. आनंदा थोरात यांनी केले व क्रांती दिनाचे महत्त्व तसेच संविधान जागृती याविषयी आपले विचार मांडले.
याप्रसंगी संस्कार सोशल फाउंडेशनचे अँड. पंडीत गायकवाड , पारधी मुक्ती आंदोलनाचे प्रकाश वायदंडे, ओबीसी संघटनेचे गणेश हिंगमिरे, भानुदास वास्के, रोटरी क्लबचे शिवराज माने, रघुनाथ डुबल, देवानंद हुलवान, चंद्रकुमार डांगे, गजानन माने, रामचंद्र लाखोले व वंचित आघाडीचे संतोष बोलके तसेच राहुल भोसले, पंकज काटरे, राजेश पिसाळ , किशोर सातदिवे यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे संघटनांचे प्रतिनिधीच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास शहरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ दाभाडे यांनी मानले .