– ऑक्टोबर २१, २०२३
बारामती: (मूकनायक प्रतिनिधी.गणेश मच्छिंद्र भोसले )
बारामती शहरातील गुणवडी चौक जवळील जुनी भाजी मंडई मध्ये अनेक वर्ष भाजी मंडई भरत होती. गणेश मार्केट नवीन झाल्यावर सर्व भाजी विक्री तिकडे चालू झाली. जुन्या जागेत बारामती नगर परिषदेचे जवळपास २०० गाळेधारक व्यावसायिक अनेक वर्षापासून व्यवसाय करत आहेत. परंतु आता विकासाचे वारे शहरात जोरात वाहत असून त्यामुळे जुनी मंडई पाडून त्याजागी कमर्शिअल कॉम्प्लेक्स बांधायचे निश्चित झाले आहे.
परंतु जुन्या गाळेधारकांना कुठेही विश्वासात न घेता किंवा त्यांना जमेत न धरता त्यांना पर्यायी योग्य जागा कुठे देणार हे निश्चित न करता गाळ्यावर हातोडा मारून प्रशासनाने ऐन सणाच्या काळात कारवाई ची दहशत निर्माण केल्याचे परवा दिसून आले. ह्या अचानक केलेल्या कारवाई मूळे गाळेधारकांमध्ये प्रचंड चीड व आक्रोश निर्माण झाला आहे.
नगर परिषदकडून कंत्रादार उत्तम धोत्रे याकडून तोडफोड करण्यात आली. त्यावेळेस प्रचंड तणाव व वाद निर्माण झाला होता. वरून पडण्याचा आदेश असल्यामुळे कंत्राटदार ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. परंतु लोकांच्या रोषामुळे काम थांबवण्यात आले.
दुसऱ्या दिवशी गाळेधारकांनी निषेध करत दुकाने बंद ठेवून मुंबई ला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेकडे न्याय मागण्यासाठी गेले होते. प्रामुख्याने गाळेधारकांची मागणी होती
१) पर्यायी जागा नवीन कॉम्प्लेक्स मध्ये तळघरात नसावी.
२) दुकाने कुठे कशी मिळणार यांचे नकाशे आम्हाला दाखवण्यात यावे.
३) दुकानांना भाडे योग्य व अल्प असावे व डिपॉझिट नसावे.
४) आमचे विस्थापण योग्य पद्धतीने झाले तरच आम्ही पाडण्यास तयार आहोत. तसे आम्हाला लेखी अग्रिमेंट झाले पाहिजे.
अशा योग्य मागण्या मा. अजितदादांना सांगितल्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती तसेच सविस्तर मार्ग बारामतीत आल्यावर भेटून काढू असे आश्वासन दादांनी दिल्याचे गाळेधारकांच्या वतीने सुधीर वाडेकर, महावीर जवारे, सनी गालिंदे, बाळासाहेब चांदगुडे, ओंकार राऊत, सुरेश झवेरी यांनी बोलताना प्रतिक्रिया दिली.