दौंड, दि. २७ (विजय बागडे, मूकनायक प्रतीनिधी):- सुमारे वीस वर्षांपासून बारामती बस स्थानकास विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी लढत असलेल्या राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेचे संस्थापक मा. प्रशांत विष्णु सोनवणे आणि त्यांच्या सहकार्यांच्या लढ्याला यश लाभले असून खासदार सुप्रियाताई सुळे यांनी बारामती बस स्थानकास विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव लवकरच देण्याची आश्वासन वजा घोषणा केली आहे.
बारामती बस स्थानक बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सन १९५७ साली महार वतनी जमीन संपादन केली. त्या वेळी काही भुमीपुत्रांनी महाराष्ट्र शासनाकडून मिळालेला जमीनीचा मोबदला घेतला तर काही भुमीपुत्रांनी बसस्थानक बांधण्यासाठी जमीन देण्यास विरोध केला होता. गेली वीस वर्षांपासून राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेचे संस्थापक मा. प्रशांत विष्णु सोनवणे त्यांच्या सहकाऱ्यांसह बारामती बस स्थानकास भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी अनेक वर्षांपासून महाराष्ट्र शासनाकडे करीत आहेत. तसेच बारामती बस स्थानक ज्या लोकांच्या जागेवर बांधण्यात आले आहे पण त्यांना अद्याप पर्यंत महाराष्ट्र शासनाकडून एक रुपया मिळाला नाही त्या भुमीपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासन व बारामती चे लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधण्यासाठी विविध आंदोलने करत आहेत.
आज दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौ सुप्रियाताई सुळे बारामती दौऱ्यावर आले असताना राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेचे संस्थापक मा प्रशांत विष्णु सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने स्मरण पत्र दिले त्या वेळी खासदार सौ. सुप्रियाताई म्हणाल्या की बारामती बस स्थानकास भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव लवकरच देऊ तसेच बस स्थानक ज्या लोकांच्या जागेवर बांधण्यात आले पण अद्याप पर्यंत एक रुपया मिळाला नाही अशा भुमीपुत्रांना महाराष्ट्र शासनाकडून चालु बाजारभावाप्रमाणे मोबदला मिळवून देण्यासाठी मी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करत आहे. त्या वेळी बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी मा. महेश रोकडे साहेब यांना आदेश दिले आहेत की, बारामती बस स्थानकास विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याबाबतचा तसेच बस स्थानक ज्या लोकांच्या जागेवर बांधण्यात आले पण त्यांना अद्याप पर्यंत एक रुपया मिळाला नाही त्या भुमी पुत्रांना महाराष्ट्र शासनाकडून चालु बाजार भावाप्रमाणे मोबदला मिळावा हे म्हणून प्रस्ताव तयार करून महाराष्ट्र शासनास पाठवा, असे सौ सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. त्या वेळी राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेचे शिष्ट मंडळ उपस्थित होते.