Sunday, December 22, 2024
Homeनाशिकनाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघातील जाहीर प्रचाराची सांगता

नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघातील जाहीर प्रचाराची सांगता

उमेदवार आणि राजकीय पक्षांना कोणत्याही माध्यमातून जाहीर प्रचारास प्रतिबंध – जिल्हाधिकारी जलज शर्मा

20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

रेणुका गायकवाड – महाले नाशिक ब्युरो चीफ ,
दि. 18 नोव्हेंबर, 2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठीच्या नाशिक जिल्ह्यातील जाहीर प्रचाराची आज, सोमवारी सायंकाळी 6 वाजता सांगता झाली. विधानसभा मतदारसंघासाठीच्या मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होत आहे. सर्व मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे. जाहीर प्रचाराची सांगता आज झाल्याने कोणत्याही उमेदवार अथवा राजकीय पक्षांना आता कोणत्याही माध्यमातून जाहीर प्रचारास प्रतिबंध असेल, असे निवडणूक यंत्रणेने स्पष्ट केले आहे.

जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी आज विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रचार सांगतेसंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय आचारसंहिता कक्षाचे प्रमुख राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले की, मतदान संपण्याकरिता निश्चित केलेल्या वेळेच्या 48 तास आधी म्हणजेच आज दि. 18.11.2024 सायंकाळी 6.00 वाजता निवडणुकीचा जाहीर प्रचार समाप्त झाला आहे. यामुळे मतदान संपण्याकरिता निश्चित वेळ संपण्याच्या 48 तासांच्या कालावधीत निवडणुकीच्या संबंधात कोणतीही सार्वजनिक सभा किवा मिरवणुका आयोजित करता येणार नाहीत तसेच घेता येणार नाहीत. चलचित्र, दूरदर्शन किंवा तत्सम अन्य उपकरण संचाद्वारे कोणतीही निवडणूक विषयक माहिती जनतेसाठी प्रदर्शित करता येणार नाही. या कालावधीत ध्वनीक्षेपक यंत्र वापरास बंदी आहे. प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर मतदारसंघात बाहेरून आलेले राजकीय / पक्ष कार्यकर्ते जे त्या मतदारसंघाचे मतदार नाहीत अशांच्या मतदारसंघातील उपस्थितीवर बंदी आहे. याच कालावधीत जनमत कलचाचणी किंवा कोणत्याही निवडणूक सर्वेक्षणाच्या निकालाची माहिती इलेक्ट्रॅीनिक माध्यमात प्रदर्शित करणेस मनाई आहे. या तरतुदींचा भंग करेल ती लोकप्रतिनिधीत्व अधिनियम,1951 च्या कलम 126 नुसार शिक्षेस पात्र असेल, असे त्यांनी नमूद केले.

निवडणुका खुल्या मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी दि. 18 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून दि. 20 नोव्हेंबर 2024 मतदान संपेपर्यंत कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे. तसेच दि. 23.11.2024 रोजी मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण दिवस नाशिक जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय, अवैध पैसा, दारू, भेटवस्तू वाटपावर निर्बंध असणार आहेत. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके सतर्क असून याबाबत नागरिकांना सी -विजील (C-Vigil) ॲपवर तक्रार दाखल करता येईल. FST आणि SST पथकासोबत केंद्रीय सुरक्षा दलाचे जवानही त्यासाठी तैनात असतील.

जिल्ह्यात 15 विधानसभा मतदार संघांसाठी एकूण 4922 मतदान केंद्र असून मतदान पथकांना साहित्य वाटप दि. 19.11.2024 रोजी सकाळी 8 वाजेपासून संबंधित मतदारसंघांचे साहित्य वाटप केद्रांमधून करण्यात येईल. प्रत्येक मतदान पथकात एक मतदान केंद्राध्यक्ष आणि तीन मतदान अधिकारी तसेच एक शिपाई कर्मचारी आणि एक पोलिस कर्मचारी असतील. प्रत्येक विधानसभा मतदार संघाचे ठिकाणी केंद्रांच्या संख्येनुसार 10 टक्के राखीव मतदान पथके ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यात 24610 आणि 2461 राखीव असे एकूण 27071 कर्मचारी निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी दिली. जिल्ह्यात मतदानासाठी बीयु- 7026 सीयु – 5899 आणि व्हीव्हीपॅट – 6391 वापरण्यात येत आहेत. मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांची मतदान केंद्रांवर ने -आण करण्यासाठी 511 बसेस, 91 मिनी बसेस आणि 1017 जीप्स या वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मतदानासाठी आवश्यक पुरावे – मतदानासाठी येतांना मतदारांनी आयोगाकडून देण्यात आलेले निवडणूक ओळखपत्र (EPIC – Electors Photo Identity Card) ओळखीसाठी आणावयाचे आहे. जर निवडणूक ओळखपत्र नसेल तर आयोगाने निर्धारित करून दिलेल्या 12 पुराव्यांपैकी एक पुरावा ओळखीसाठी आणणे आवश्यक आहे. ओळखीसाठी निर्धारित करणेत आलेले 12 पुरावे पुढीलप्रमाणे आहेत. यामध्ये, आधार कार्ड, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे जॅाब कार्ड, बॅंकेचे / पोस्टाचे फोटो असलेले पासबुक, श्रम मंत्रालयाकडून जारी करणेत आलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, पॅन कार्ड, एनपीआर अंतर्गत रजिस्ट्रार जनरल यांचेकडून जारी करणेत आलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटो असलेले पेन्शन कागदपत्रे, केंद्र / राज्य सरकार तसेच केंद्र / राज्य सरकारचे उपक्रम सार्वजनिक कंपनी इ. कडून त्यांचे अधिनस्त अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी निर्गमित करणेत आलेले फोटो असलेले ओळखपत्र, संसद सदस्य, विधानसभा / विधान परिषद सदस्य यांना जारी करणेत आलेले शासकीय ओळखपत्र आणि सामाजिक न्याय विभाग भारत सरकार यांचेकडून निर्गमित युनिक डिसॲबिलिटी ( युडीआयडी ) कार्ड आवश्यक असणार आहे. हे पुरावे मुळ प्रतीत ( Hard Copy ) आणावे लागेल. Digital स्वरूपातील पुरावा वापरता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले की, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या आत मोबाईल आणता येणार नाही. मतदान केंद्राचे ठिकाणी मतदार सहायता कक्षाचे ठिकाणी बीएलओ उपस्थित राहून मतदारांना मतदान केंद्राच्या मतदार यादी भागातील मतदाराचा अनुक्रमांक शोधून देण्यासाठी मदत करतील. याशिवाय. व्होटर हेल्पलाईन ॲपद्वारे (Voter Helpline App) मतदारांना त्यांचे मतदान केंद्र, मतदार यादी भागातील अनुक्रमांक माहित करून घेता येईल. मतदान केंद्रावर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक मुलभूत सुविधा जसे पिण्याचे पाणी, मतदारांसाठी शेड, माहितीदर्शक फलक, टॅायलेट, व्हीलचेअर, पाळणाघर, स्वयंसेवक आदी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तीन संपूर्ण महिला संचलित मतदान केंद्र, एक संपूर्ण दिव्यांग कर्मचारी संचलित मतदान केंद्र आणि, तीन संपूर्ण युवा कर्मचारी संचलित मतदान केंद्र देण्यात आले आहेत. याशिवाय, मतदान प्रक्रियेचे संनियंत्रणासाठी जिल्ह्यात 3280 मतदान केंद्रांचे वेबकास्टींग करणेत येत आहे. दर दोन तासांनी झालेल्या मतदानाची आकडेवारी व्होटर टर्नआऊट (Voter Turnout) ॲपद्वारे नागरिकांना पहाता येईल. दि. 20.11.2024 रोजी मतदान समाप्त झाल्यावर मतदान पथके संबंधित विधानसभा मतदार संघाच्या साहित्य स्वीकृती केंद्राकडे आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान पथकांकडून मतदान यंत्रे आणि मतदान साहित्य संकलन केंद्राचे ठिकाणी संकलित करणेत येईल, अशी माहितीही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी दिली.

त्याचबरोबर जिल्हाधिकारी श्री जलज शर्मा यांनी आज रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रचार कालावधी संपल्यानंतर मतदारसंघातील
राजकीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीवर आदर्श आचारसंहितचे निर्बंध सुरू करण्यात आल्याची घोषणा केली.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान व 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्‍ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय वातावरणात पार पडण्याच्या दृष्टिकोनातून प्रचार कालावधी संपल्यांनतर मतदारसंघातील राजकीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीवर 18 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत आदर्श आचारसंहितेचे निर्बंध लागू करणे संदर्भात जिल्हादंडाधिकारी जलज शर्मा यांनी आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार विधानसभा सर्वसाधारण निवडणूक प्रचारादरम्यान राजकीय पक्ष प्रचाराला भरीव चालना देण्यासाठी, मतदारसंघाच्या बाहेरून पाठीराख्यांना आणण्यासह त्यांच्या समर्थकांची हालवाहलव करतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, प्रचार कालवाधी संपल्यानंतर, मतदारसंघात कोणताही प्रचार होऊ नये यासाठी, मतदारसंघाच्या बाहेरून आनलेले आहेत व जे त्याच्या / तिच्या मतदारसंघाचे मतदार नाहीत असे राजकीय कार्यकर्ते, पक्ष कार्यकर्ते, मिरवणुकीतील कार्यकर्ते, प्रचार कार्यकर्ते इत्यादींना नियतिमपणे मतदारसंघामध्ये उपस्थित राहता येणार नाही. कारण प्रचार संपल्यानंतर त्यांच्या निरंतर उपस्थितीमुळे मुक्त व निष्पक्ष मतदानाचे वातावरण धोक्यात येऊ शकते.

अशा सर्व कार्यकर्त्यांनी प्रचार कालावधी संपताच तत्काळ मतदारसंघ सोडला आहे याची सुनिश्चिती करण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी आवश्यक उपाययोजनांचा अवलंब करावा. यानुसार जेथे असे लोक निवासास आहेत असे कल्याण मंडप, मंगल कार्यालये, सामुहिक सभागृहे इत्यादींची तपासणी करून या परिसरात बाहेरील लोक निवासास आहेत किंवा कसे याबाबत शोध घ्यावा. निवासीगृहे व अतिथीगृहांची पडताळणी करून तेथे राहणाऱ्यांचा यादीचा मागोवा घेत राहणे. मतदारसंघाच्या सीमांवर तपासणी नाके उभारणे आणि मतदारसंघाच्या बाहेरून येणाऱ्या वाहनांच्या येण्या- जाण्याचा मागोवा घेणे. लोकांच्या, समुहांच्या ओळखपत्रांची , ते मतदार आहेत किंवा नाहीत याचा शोध घेण्याच्या दृष्टीने व ओळख पटविण्याच्या दृष्टीने पडताळणी करणे आवश्यक आहे.

या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरूद्ध भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 223 अन्वये कारवाई केली जाईल असेही जिल्हादंडाधिकारी श्री. शर्मा यांनी आदेशित केले आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments