पुणे / पिंपरी (दि.२१) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून गहुंजे (ता.मावळ) भागात अनधिकृत बांधकाम प्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्पुर्वी बांधकाम धारकाला अनधिकृत बांधकाम थांबविण्याची नोटीस दिली होती. पण त्याचे अनुपालन न केल्याने एका जणावर पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला.
गहुंजेमधील स.नं. १३८ मध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्या मीना विजय आहेर (रा. गहुंजे, ता.मावळ) यांचे विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. संबंधित बांधकामधारकांना पीएमआरडीएकडून अनधिकृत बांधकाम थांबविणेसाठी वेळोवेळी नोटीसद्वारे कळवले होते. पण बांधकामधारक यांनी पीएमआरडीएच्या नोटीसचे अनुपालन न केल्याने त्यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 कलम 54(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील मालमत्ताधारकांनी परवानगी घेवूनच आपली बांधकामे करावीत, यासह चालू असलेली अनधिकृत बांधकामे तात्काळ थांबवावीत, असे आवाहन करण्यात येत आहे. अन्यथा संबंधितांवर नियमाप्रमाणे कारवाई करणार असल्याचे अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाने स्पष्ट केले आहे. गुन्हे दाखल करण्याची कारवाई पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सह आयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार आशा होळकर, रविंद्र रांजणे, कनिष्ठ अभियंता अभिनव लोंढे यांनी केली.
- डॉ. ज्ञानेश्वर भाले, जनसंपर्क अधिकारी, पीएमआरडीए