पुणे , दि 26 : बुद्धघोष हौसिंग सोसायटी, भारतीय बौद्ध महासभा शाखा सांगवी पूर्व, तक्षशिला महिला संघ व त्रिरत्न ग्रुप यांच्या विद्यमानाने 26 नोव्हेंबर 2024 रोजी बुद्धघोष बुद्धविहार, जुनी सांगवी येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.यावेळी विचार मंचावर प्रमुख वक्ते ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सुरेंद्र जानराव,ॲड. वसंतराव जाधव,ॲड. प्रकाश होवाळ, तक्षशिला महिला संघाच्या अध्यक्षा सुवर्णाताई सकपाळ तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. रवींद्र इंगोले उपस्थित होते. सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर वंदना व भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या करीता वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या . या स्पर्धेचा विषय ” भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क व कर्तव्ये” असा होता. या वक्तृत्व स्पर्धेत धीरज जाधव, प्रांजल भालेराव, भूषण जाधव, अपूर्वा खाडे व किमया कांबळे यांनी भाग घेतला.त्यानंतर प्रमुख व्याख्याते ॲड.सुरेंद्र जानराव यांनी ” संविधान” विषयावर बोलताना सांगितले की, बाबासाहेबांच्या वाटचालीमध्ये रामजी बाबांचे योगदान हे फार मोठे होते. रात्री दोन वाजेपर्यंत जागरण करून भिमाला त्यांनी वेळोवेळी अभ्यासासाठी प्रोत्साहन दिले. संघर्ष केल्याशिवाय ताकद निर्माण होत नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी विपरीत परिस्थितीशी व स्वतःशीच संघर्ष केला. महात्मा फुले यांच्या समाज कार्यातून प्रेरणा घेऊन बाबासाहेबांनी पुढील वाटचाल केली. त्यावेळी ब्रिटिशांचा गव्हर्मेंट ऑफ इंडिया 1950 चा कायदा अस्तित्वात होता. सुरुवातीला सुमारे 200 छोटे छोटे राज्य, संस्थाने व त्यांचे राजे होते व त्यांचे कायदे होते. शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या काळामध्ये शिक्षणाबाबत खूप बदल झाले. पुढे संविधान निर्मितीच्या काळामध्ये सर्वांनी बाबासाहेबांचे नेतृत्व मान्य केले. बाबासाहेब म्हणायचे की,” नुसती समानता उपयोगी नसून त्यासोबत सर्व स्तरावर समान तत्व अंगीकारले पाहिजे, कायद्याने सर्वांना समान संरक्षण, मालमत्तेचे अधिकार व इतर हक्क दिले पाहिजेत.” बाबासाहेबांनी संविधानात सांगितलेल्या प्रास्ताविकेमध्ये जे आम्ही भारताचे लोक, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष इ.शब्द आहेत त्याचे विश्लेषण ॲड. जानराव यांनी केले. ते म्हणाले की,सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय याबाबत बाबासाहेबांची विचार करण्याची प्रक्रिया ही 1932 मध्ये पुणे कराराच्या वेळी झाली होती. यावेळी ॲड. जानराव यांनी सार्वभौम शक्तीचे व इतर उदाहरणे सांगितली. आपल्या शिक्षणाचा ज्ञानाचा वापर समाजासाठी केला पाहिजे, शिक्षण घरातून सुरू होते, त्यासाठी अभ्यास करण्याची आवड निर्माण झाली पाहिजे असे वातावरण निर्माण करा. बाबासाहेबांच्या शिकवणीचे अनुकरण करा, तुमचा आरसा तुम्ही बना तसेच संविधानाबाबत नितांत आदर ठेवून त्याबाबत वाचन व अभ्यास करत चला,असे आवाहन त्यांनी ह्यावेळी केले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. रवींद्र इंगोले यांनी सांगितले की, स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर या देशाने दोन घटना बघितल्या. परंपरागत रूढी, विषमता, भेदभाव, असमानता याचे समर्थन करणारा ग्रंथ 1927 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जाळला व समता -समानता, एकता- एकात्मता, बंधुता, राष्ट्रीय भावना जपणारा दुसरा ग्रंथ अर्थात भारतीय संविधान सुमारे वीस वर्षानंतर स्वतः लिहून या देशाला 26 नोव्हेंबर 1949 रोजी अर्पण केला. या वीस वर्षाच्या कालावधीत बाबासाहेबांनी फार मोठा संघर्ष केला. त्यांनी आंदोलने, चळवळी, सभा घेतल्या. त्यांच्या वैयक्तिक ,सामाजिक व राजकीय जीवनात बाबासाहेबांनी मोठा त्याग केला. त्यांचे हे योगदान सर्वार्थाने मोठे, अविस्मरणीय व प्रेरणादायी आहे. संविधानाच्या संरक्षण व संवर्धनासाठी, योग्य प्रकारे अंमलबजावणीसाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा. दर रविवारी सकाळी 11 वाजता विद्यार्थ्यांच्यासाठी धम्म संडे स्कूल सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच वत्यात सहभागी होण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. ॲड. प्रकाश होवाळ यांनी वक्तृत्व स्पर्धेतील निकालाचे वाचन करून सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. बुद्धघोष हौसिंग सोसायटीचे चेअरमन शरद जांभळीकर यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सुवर्णा सकपाळ यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी अरुण रणदिवे, मारुती मोहिते, विलास जाधव, अशोक काळे, आनंद महाडिक, जी.आर. कांबळे, पी. आर. गायकवाड, सुरेश शिंदे, ज्ञानेश्वर खाडे यांनी व इतर सदस्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.