मुकनायक कोल्हापूर प्रतिनिधी राहुल कांबळे
कोल्हापूर, दि.6 : सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात सन 2023 या वर्षात कोल्हापूर जिल्ह्याने 2 कोटी रुपये 124.38 टक्के संकलन करुन उद्दिष्ट पूर्ण केले. एवढा मोठा निधी संकलित करुन जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक मिळविल्याबद्दल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते जिल्ह्याला गौरवण्यात आले. सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या ७५ व्या (अमृतमहोत्सवी) वर्धापन दिनानिमित्त राजभवन, मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) भीमसेन चवदार यांनी हा सन्मान स्वीकारला. सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा आरंभ या कार्यक्रमात करण्यात आला. सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल (नि.) दीपक ठोंगे यांनी राज्यपालांच्या परिधानाला सैन्य दलाच्या ध्वजाची प्रतिकृती लावली व राज्यपालांनी ध्वजनिधीला आपले योगदान दिले. सन 2023 साठी राज्य शासनाने कोल्हापूर जिल्ह्याला 1 कोटी 60 लाख 79 हजार रुपयांचे उद्दीष्ट दिले होते. ध्वजदिन निधी कल्याण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने वर्षभरात दोन कोटी रुपये (124.38 टक्के) ध्वजदिन निधीचे संकलन केले. यात विविध शासकीय विभाग व वैयक्तिक स्वरुपातही अनेकांनी अर्थसहाय्य केले आहे. देशाच्या संरक्षणासाठी प्राण अर्पण केलेले जवानांच्या तसेच माजी सैनिकांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना या निधीतून राबवल्या जातात. तसेच सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना या निधीतून अर्थसहाय्य केले जाते.