मुंबई, दि 7 : बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण करताना एका मानसिक द्वंद्वाकडे लक्ष द्यावे लागेल. हे द्वंद्व स्पष्ट दिसत नाही. पण परिणामदेई आहे. या द्वंद्वाची स्पष्टता करायचीच तर , काल की उद्या या वळणाने करावी लागेल. भारतीयांत कालच्या स्मृतीत रमण्याची राहाटी आहे. तो त्यात रमतो. आमचे दिवस .. आमची थोरता .. आमची संस्कृती .. वगैरे .. वगैरे ! या मनोरचनेवर हिंदुत्वाचा ताबा असतो. त्यातून अद्याप सुटका नाही. किंबहुना अधिक वाढ होतेय . ही वाढ इतरांनाही आपल्या कवेत घेतेय. यातून सुटका होणे हे बाबासाहेब आंबेडकरांचे पूज्यस्मरण ठरेल. ते कसे ? जर असे झाले तर अवलोकन .. परीक्षण .. निदान याचे महत्त्व वाढेल. स्मृतीलढे , कृतीलढ्यात बदलू शकतील. वैचारिक प्रवास तसा जाईल. कालचे प्राबल्य कमी होईल. जोडीला आज आणि उद्या येतील. अशी सम्यकता येणे फार गरजेचे आहे. ती आज आणि उद्याकडे झुकली तर अधिकच चांगले. अर्थात कालच्या घटनांत रमणे प्रमाद नव्हे. पण त्यातच रमणे वैचारिकतेला खंडित करणे होय. विकास .. उन्नयन .. सुखावहता या स्थितीची निर्मिती आज आणि उद्यात असते. ती वाहती असावी. कसोटीवर असावी. तोच आंबेडकरवाद ! हिंदुत्वाने वैचारिकतेच्या विविध शक्तीस्थळावर असाच ताबा केलेला ! अनेक शक्तीस्थळे कल्पित आहेत. तरीही प्रभावी . सुटका कशी ? ती एकप्रकारची गुंगी असते. तिचा अवलोकनावर ताबा असतो. हे अवलोकन नेहमी कालकडे नेते. याचमुळे .. भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळाले .. असे प्रश्न सूचतात. ते उचलल्या जातात. स्वातंत्र्याचे मूल्यमापन असे सूचत नाही. हे स्वातंत्र्य कशासाठी मिळाले .. ती पूर्ती झाली काय ? आजची स्थिती कशी ? हे सूचत नाही. असे का सूचत नाही हे विचारायचेही सूचत नाही. तसे डबके साचत जाते. मूळ कारण , प्रवाह थांबलेला असतो. प्रवाहाचा पक्षधर आंबेडकरवाद हाही थांबतो की काय ? जे जे आंबेडकरांनी पूढचे सांगितले त्याचे काय ? जे धोके सूचित केले त्याचे काय ? ते मूल्यमापन कोण करेल ? त्या सत्यकथनाचे काय ? खरेतर तीच मोठी जबाबदारी ! तेच स्मरण ! पुतळे , स्मारक , दिवस यांना मर्यादा आहेत. ते अंतिम नव्हे. थांबा आहे. प्रवास नव्हे. तिथेच थाबणे भयंकर होईल. तिथे उर्जा घेऊन पूढे निघावे. रोजच्यारोज लक्ष्य दूर जातेय. तो काळजीचा विषय ठरावा. लेखनाचा विषय व्हावा. जागते रहोचे आंदोलन व्हावे. जेव्हढी भक्ती ‘ प्राब्लेम ऑफ रुपी ‘ वाचण्यात संचरते त्यातुलनेत ‘ प्राब्लेम ऑफ प्रायव्हटायझेशन ‘ शोधण्यात अंशमात्रही नाही. असा विरोधाभास का ?म्हणून काही विचारसरणींनी पुतळा वर्ज्य केलाय. ते टोकाचे होईल. आपण सम्यकमार्गी. आपल्याला समतोल , संतुलन साधता येतो. तो साधावा. आता अग्रक्रम तोच. कठीणमार्ग सोडू नये. सोप्या मार्गाच्या छंदात पडू नये. तो फंद होईल. अक्षरबध्द बाबासाहेब परत परत नवनव्या वेष्टनात किती दिवस ? तेव्हढेच नको. जर संविधान देताना .. अन्यथा , सामाजिक-आर्थिक विषमता वाढत जाईल .. असे जे बाबासाहेबांनी म्हटले ते कसे हे सांगायला ते परत येणार नाही. ती जबाबदारी आपली नव्हे काय ? अर्थव्यवस्था विधीमंडळाच्या इच्छेवर न सोपविता घटनात्मक विधीनियमाद्वारे निश्चित व्हावी असे बाबासाहेबांना वाटायचे. ते कसे ? ते नवे संदर्भ घेत नव्याने सांगायची जबाबदारी आपली नव्हे काय ? संविधानाची अंमलबजावणी किती ? हे कोण विचारेल ? तशी स्पष्टता येणे .. जाब विचारण्याकडे जाणे .. हाच आंबेडकरवाद . अंधार का असतो ? कारण तिथे प्रकाश नसतो. असे साधे तत्त्व आहे. प्रकाशाचा थेट संबंध आंबेडकरवादाशी आहे. आधी प्रकाश न्यावा. अंधार ओळखता येतो. अंधार सरतो. प्रकाश नेणे महत्वाचे. तेच जिकिरीचे. ते नेले की आंबेडकर सहज जातील. आधी बंधता मुक्त करावी. जबाबदारी मोठी आहे. पण कल्याणकारी आहे. आपण उजेडमार्गी. आपली जबाबदारी मोठी. लघुवाट आपली सोबती नाहीय. यात देर आहे. अंधेर नाही. म्हणून कालची कूस , उद्यासाठी प्रसवशील ठेवावी. अन्यथा वांझपण येईल. उत्सवात हरवून जाईल. ती दक्षता महत्वाची आहे. तसेही आपण संकल्पयात्री आहोत. म्हणून बुध्दिजीवींनी हे आव्हान स्वीकारावे. आपोआप नवनवे सूचेल. नवे विषय सूचतील. निरीक्षणाचा आवाका वाढेल. कालमध्ये संतुष्टी खूप झाली. आता नवे. आजचे. उद्याचे.आव्हानांकडे जावे. सर्वसामान्य प्रवाहही तिकडेच येईल. हेच पूज्यस्मरण ! हेच जयभीम ! आजच्यादिनी !
० रणजित मेश्राम .👤