‘नो यूवर आर्मी’ प्रदर्शनातून तरुणांना मिळेल प्रेरणा जिल्हाधिकारी जलज शर्मा.
रेणुका गायकवाड – महाले, नाशिक ब्युरोचीफ
नाशिक, दि.14: भारतीय सैन्य दलाच्या आयुधांची माहिती देणाऱ्या ‘नो यूअर आर्मी’ प्रदर्शनाच्या माध्यमातून तरुणांना प्रेरणा मिळेल. त्यातून भारतीय सैन्य दलाला अधिकारी आणि जवान मिळतील, असा विश्वास जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी येथे व्यक्त केला.जिल्हाधिकारी कार्यालय, आर्टिलरी स्कूल देवळालीआणि भोसला मिलिटरी स्कूल यांच्यातर्फे आजपासून ‘नो यूअर आर्मी’ या सैन्य दलाच्या शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा उद्घाटन सोहळा आज सकाळी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. शर्मा बोलत होते. यावेळी लेफ्ट. जनरल नवनीतसिंग सैना प्रमुख पाहुणे होते, तर महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, उपायुक्त डॉ प्रदीप चौधरी, संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. अविनाश भिडे, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष एअर मार्शल डॉ. अजित भोसले, संस्थेचे सरकार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे, ऍड . नितीन ठाकरे आदी उपस्थित होते.यावेळी भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घोडेस्वारी, बँड पथक, कवायत, मल्लखांब, जिमनॅस्टिकची विविध प्रात्यक्षिके सादर केली.जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले की, सैन्य दल शस्त्रास्त्र प्रदर्शन संकल्पना कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे. या उपक्रमास जिल्हा प्रशासनाने पूर्णपणे सहकार्य केले आहे. पोलिस आणि महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या नियोजनाचे जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी कौतुक केले.लेफ्ट. जनरल श्री. सैना म्हणाले की, भारतीय सैन्य दलाचे शौर्य अतुलनीय आहे. या प्रदर्शनात विविध आयुधे नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. विद्यार्थी आणि नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. तसेच या प्रदर्शनातून विद्यार्थांना प्रेरणा मिळून सैन्य दलात सहभागी होतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.एअर मार्शल डॉ. भोसले म्हणाले की, आजचा दिवस अत्यंत महत्वपूर्ण आहे. भारताने शत्रू सैन्याशी लढून जिंकलेल्या युद्धात उपयोगात आणलेली शस्त्रास्त्रे पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सैन्य दलात साधन सामग्री बरोबरच मनुष्यबळाला महत्व आहे. श्री. देशपांडे यांनी आभार मानले. दरम्यान, या प्रदर्शनानिमित्त मांडण्यात आलेल्या विविध स्टॉलला जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांच्यासह मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली. प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.