मूकनायक रिपोर्टर तानाजी राजवर्धन.
अतिग्रे, कोल्हापूर दि.८: ईगल फौंडेशनच्या वतीने संजय घोडावत विद्यापीठ अतिग्रे, कोल्हापूर येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या विविध मान्यवरांचा राष्ट्रीय, राज्य व जिल्हा पातळीवरील यशस्वी गुणवंतांचा त्यांच्या कार्याचे, योगदानाचे यथोचित मूल्यमापनानुसार विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त कस्टम ऑफिसर, समता सैनिक दलाचे सैनिक, अटल सेतूचे प्रथम प्रवासी – आयु. मदन लाला पवार यांना त्यांच्या तीस वर्षाच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून ‘ईगल फाउंडेशन’ कडून देण्यात येणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आले आहे.
संजय घोडावत विद्यापीठामध्ये रविवार दि.८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता या पुरस्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे माजी खासदार निवेदिता माने, उद्योजक श्री. एन.सी.संघवी, डॉ.शंकर अंदानी, श्री प्रविण काकडे, श्री सुर्यकांत तोडकर – विश्वस्त डॉ. डी. वाय पाटील शिक्षण समुह, उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, हातकणंगलेचे तहसिलदार सुशिल बेलेकर ईगल फौंडेशनचे प्रेसिडेंट श्री विलासराव कोळेकर यांच्यासह त्यांचे सहकारी प्रा.सागर पाटील, प्रा. प्रकाश मंजुळे श्री शेखर सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ.डी. वाय. पाटील शिक्षण समूह, कोल्हापूर, पुणे व मुंबई चे विश्वस्त मा.सूर्यकांत तोडकर यांनी यशस्वी विजेत्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन केले. मदन पवार यांनी त्यांना मिळालेला राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार २०२४ दानशूर उद्योगपती स्मृतिशेष रतन टाटा यांना समर्पित केला आहे.