रेणुका गायकवाड , नाशिक ब्युरो चीफ
नाशिक,दि. 10: सशस्त्र सेना ध्वजदिन हा भारतीयांसाठी महत्वाचा दिवस आहे. दिवस या दिवसापासूनच लष्काराच्या तिन्ही दलाचे प्रतीक असलेला ध्वज प्रदान करून त्या निमित्ताने ध्वजदिन निधी संकलनाला सुरूवात होते. वर्ष 2023-24 मध्ये 154 टक्के ध्वजदिन निधीची उद्दिष्टपूर्ती झाली असून यात जिल्हावासियांचे भरीव योगदान आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.आज नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 शुभारंभ कार्यक्रम झाला, यावेळी जिल्हाधिकारी श्री. शर्मा बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल विलास सोनवणे, विंग कमांडर राहुल पवार, दिंडारी तहसीलदार मुकेश कांबळे यांच्यासह वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय, शासकीय कार्यालयांचे प्रमुख, शाळा व महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले की, शासनाकडून ध्वजदिन निधी सन 2023-24 साठी रुपये 1 कोटी 38 लाख 67 हजार उद्दिष्ट देण्यात आले होते. नाशिक जिल्ह्याने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा आपल्या जिल्ह्याने रु. 2 कोटी 13 लाख 70 हजार इतके म्हणजे एकूण 154.10 टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. ही बाब अभिमानास्पद आहे. आपल्या जिल्ह्यात आर्टिलरी ट्रेनिंग सेंटर, स्कूल ऑफ आर्टिलरी, CATS हेलिकॉप्टर ट्रेनिंग सेंटर आहेत त्यामुळे जिल्ह्यातील मुलांना आर्मीत भरती होणेसाठी मार्गदर्शन करुन प्रोत्साहित केले. तसेच भोसला मिलिट्री स्कूल येथे 14 व 15 डिसेंबर 2024 रोजी KNOW YOUR ARMY हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी केले. तसेच जिल्ह्याला सन 2024-2025 करीता ध्वजदिन निधीचे रूपये 1 कोटी 32 लाख 17 हजार 195 इतके उद्दिष्ट देण्यात आले असून, सर्वांच्या सहकार्याने वेळेच्या आत पूर्ण होईल अशी आशा जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी व्यक्त केली.जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नाशिक मार्फत वर्ष 2023-24 मध्ये एकूण 2 हजार 451 लाभार्थ्यांना रुपये 5 कोटी,63 हजार 577 इतके आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. तसेच 163 माजी सैनिक/विधवा पत्नी यांना रोजगार/नोकरी/पेन्शन मिळवून देऊन पुर्नवसन केले गेले असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल श्री. सोनवणे यांनी दिली.या निधी संकलनात भरीव योगदान दिलेली शासकीय कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी व वीरपत्नी व पुरस्कार विजेते यांचा सन्मानपत्र, शॉल, श्रीफळ व धनादेश देऊन जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनासह आभार जिल्हा सैनिक कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक नारायण पुंडलिक पाटील यांनी मानले.